“अरे हा एक शिवाजी गेला तर काय झाले, असे शेकडो प्रतिशिवाजी उभे केले आहेत आम्ही या स्वराज्याच्या संरक्षणासाठी.”
अनंत तिंबले यांच्या लेखनाची स्तुती मी माझ्या आजोबांच्या तोंडून फार ऐकली होती. अखेर मी एक पुस्तक उचलेच. ते होते “संभाजी- एक शापित राजहंस”. मला ते फारच आवडले आणि मी आणखी दोन पुस्तके संपवली. त्यानंतर माझी नजर पडली “सुराज्याचे प्रतिशिवाजी ” वर. ही मराठा इतिहासाची कमी समजून घेतलेली , कमी मांडलेली बाजू होती. एक अनोखा दृष्टिकोन. ही गोष्ट आहे हंबीरराव मोहितेंची , ज्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकारण्यात जिवाजी बाजी लावली. ते स्वप्न साकारलेही आणि त्याचे संरक्षण करताना जीव दिला.
हंबीरराव हे प्रख्यात सरदार संभाजी मोहिते यांचे सुपुत्र होते. “मोहिते
कुणावर अन्याय करत नाही आणि कुणावर होत असेल तर सहन करीत नाही” या
सूत्रावर मोहिते राज्य करत. जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा
विचार मांडला , तेव्हा मोहिते त्याच्या विरोधात होते. पुढे महाराज
संभाजी मोहित्यांना अटक करतात. तरी शिवाजी महाराजांशी एकमत असल्यामुळे
हंबीरराव अवघ्या १५ घोडेस्वरांसोबत महाराजांना जाऊन मिळतात.
हंबीररावांची बहीण सोयराबाई शिवाजी महाराजांची पत्नी होती. पुस्तकात
हंबीरराव शिवाजी महाराजांना हरतर्हे मदत करतांना आढळतात, अनेक वेळा
मोठ्या मोहीमा व लढायांमध्ये सहभागी झालेले दिसतात.शिवाजी महाराज
हंबीररावांकडे बऱ्याचवेळी एक सेनापती तर काही वेळी मेव्हणा या नात्याने
सल्ला मागतांना आढळतात.
"पण राजे, त्यांना दगाफटका होईल असं आपल्याला का वाटतं? "
"कारण, आमचे अधिकारी. ते शंभूराजाणांना पाण्यात पाहतात."
सोयराबाईंचा राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा आग्रह विशेषरित्या मांडलेला आहे. आणि अनेकवेळा हंबीरराव आणि सोयराबाई यांचे मतभेदही दिसून येतात. शिवाजी महाराज्यांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंचा संभाजी महाराजांना अटक करण्याचा आदेश हंबीरराव मानत नाही व उलट संभाजी राजांना जाऊन मिळतात. संभाजी महाराज आणि हंबीरराव यांचं नातं फार उत्कृष्टपणे दिसून येते. संभाजी महाराजांचा त्यांच्या सरसेनापतींवरचा भरवसा दिसतो. तसेच संभाजी महाराज त्यांच्या मामाजींवर किती अवलंबून आहेत हेसुद्धा लक्ष्यात येतं. वाईच्या युद्धभूमीवरही, शेवटच्या श्वासापर्यंत लेखकांचा हंबीर स्वराज्यासाठी लढतांना दिसतो. वैयक्तिकरित्या मला हे पुस्तक तिंबलेंच्या इतर लेखनापेक्षा ठळक व थेट वाटते. परंतु अनेकवेळा "हंबीर" ची विचारधारा तुटलेली आढळते. त्यामुळे हंबिरावांचे निर्णय ठाम वाटले तरी वाचक मात्र द्विधा मनस्थितीत राहतो. तरी, लेखकांचा हंबीररावांच्या राजकीय आणि वयक्तिक जीवनाचा संदर्भ मिळवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो . हे पुस्तक मराठी आणि मराठा इतिहासाची एक अनोखी झळक देतं. इतिहासाची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक नक्की वाचलेच पाहिजे.
लेखक - अनंत तिंबले.
पृष्ठसंख्या -२२०
प्रकाशक- रिया पब्लिकेशन्स